नमस्कार,
मी विनोद सातव अर्थात तुम्ही मला ओळखता आणि म्हणूनच तुम्ही हा blog वाचताय असं मी समजतो, पण तुमच्यापैकी काहीजण ओळखतही नसतील कदाचित आणि जे ओळखत असतील त्यांना सुद्धा मी सध्या काय करतो हे माहित असेलच असं नाही, म्हणून माझ्या या पहिल्या blog मधून मला माझा परिचय करून द्यायला आवडेल.
गेली १० वर्षे मी ज्या कार्यक्षेत्राला वाहून घेतलंय आणि ज्या क्षेत्राने मला सामावून घेतलंय त्या क्षेत्राचे मला आलेले अचाट आणि अफाट अनुभव तुमच्याशी ‘शेअर’ करावं म्हणतोय, त्यासाठी मी बऱ्याच दिवसांपासून blog नामक platform वापरण्याची योजना आखत होतो. अखेर अनेक मित्र -मैत्रिणींशी सल्ला मसलत करून मी हा माझा पहिला blog लिहित आहे.
तर, मागच्या आठवड्यात आम्ही विविध क्षेत्रांत काम करणारे मित्र मंडळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटलो आणि नेहमीचा अंगवळणी पडलेला संवाद झाला. अंगवळणी पडलेला म्हणजे “तू सध्या काय करतो?”, कसं चाललंय या प्रश्ना पासून सुरु होणारा आणि ‘मज्जा आहे बाबा तुझी’ किंवा“तुझं काय बाबा मस्त चाललंय” असं मध्यंतर किंवा आवंढा घेउन स्वतःविषयी, स्वतःच्या कामा, व्यवसायाविषयी मात्र निगेटिव्ह टोन मध्ये बोलून संपणारा. अर्थातच निगेटिव्ह टोन बाबत माझा अपवाद वगळता बरं का!, कारण मला कोणीही, अगदी कोणीही हा प्रश्न विचारला की मी सर्वांना आवर्जून सांगतो की होय, ‘मस्त चाललय’, कारण माझं काम मला सतत आनंद देतं.
तसा मी जात्याच मनमौजी माणूस आहे. माझे बालपण पुण्याच्या मध्यवस्तीत नारायण पेठेत एका वाड्यात गेले. मी निम्न मध्यमवर्गीय अशा वातावरणात वाढलो त्यामध्ये माझे मित्र अतिशय साधे, नातेवाईक निमशहरी आणि ग्रामीण भागात असल्यामुळे आज मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या विषयीचे स्वप्न पडणेही अशक्य होते. कारण माझ्या सभोवतालच्या वातावरणाचा साहित्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक या क्षेत्राशी दुरान्वयेही संबध येण्याचा प्रश्न नव्हता.
माझ्या जडणघडणी मध्ये पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वत्रिक निवडणुका आणि पुण्यात होणाऱ्या दिग्गज वक्त्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या सभांचा परिणाम झाला असावा. सार्वजनिक कार्य / सोहळे आणि समाजकारणाचे आकर्षण त्यामुळे निर्माण झाले, परंतु ‘जगण्यासाठी’ धावण्याच्या स्पर्धेत कालांतराने त्याचा प्राधान्यक्रम बदलला. हल्ली २४X७ माझ्या डोक्यात event, Creative Concept, सिनेमा, नाटक, संगीत, पुस्तके, कथा – पटकथा, साहित्य, कला, PR Strategy, मार्केटिंग, Box office, स्क्रीनिंग असे शब्द फुल टू कल्ला करत असतात. या क्षेत्रातलं पाहिलं पाउल ज्या सहकाऱ्यानां सोबत घेउन टाकलं त्याच टीम सोबत आजही कार्यरत आहे आणि पुढेही राहील.
तर, मी आणि माझ्या टीमची ‘लिड मिडिया’ ही संस्था कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात १ सप्टेंबर २००८ पासून काम करत आहे. ‘काम करत आहे’ असं म्हणण्या पेक्षा सॉल्लीड आनंद घेत आहे. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, corporate communication, राजकिय event या क्षेत्रात काम करत असताना मी माझी कल्पकता आजमावू लागलो होतो. हे करत असतानाच २०१० -११ मध्ये मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी आणि प्रमोशनच्या कामाची संधी चालून आली आणि या संधीचं सोनं करण्याची खुणगाठ मनात बांधली गेली. अर्थात ही संधी नेमकी कशी आली? पहिला सिनेमा कोणता? हे पुढे या blog सिरीज मध्ये विस्तृत लिहिनच.
परंतु, व्यवसायात १० व्या वर्षी आज मागे वळून पाहतांना अनेकाविध कार्यक्रमामध्ये भेटलेले असंख्य कलाकार, या दरम्यान पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरं, परदेशात केलेले अनेक कार्यक्रम, शुटिंग या दरम्यान आलेले उत्तमोत्तम आणि भन्नाट अनुभव, चित्रपटांच्या पडद्यामागील धम्माल किस्से लिहून ठेवावे असा विचार मनात आला म्हणून हा blog प्रपंच.
तर, माझ्या या पहिल्या blog मधून तुम्हाला लक्षात आलं असेल की ‘मी सध्या काय करतो’. तर मी मौज करतो, कारण Life is beautiful.
खूपच छान लिहितोस दादा.. बोलकं आहे लिखाण तुझ.. पुढच्या ब्लॉग च्या प्रतिक्षेत 🙂
1 no lekhani ahe vinod sir me 20 varcha hoto thenwa pasun Tumala olkat ahe aaj me 36 varshacha ahe khup. Chan tumch speech ahe aaj lekhani cha khup anand gheta aale
Thanks vinod sir
Khup chan mastch
किती सहज सांगितलंत तुम्ही सध्या काय करताय ! झकास वाटलं वाचूनच.